गोदावरी आरती Radio

“गोदावरी आरती” ही गोदावरी नदीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक जीवनातील महत्त्व कथन करणारी आहे. गोदावरी आरती मध्ये एकूण सहा श्र्लोक आहेत.[१]

श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰

भावार्थ:- या प्रथम श्लोकामध्ये गोदावरी नदी जिथे उगम पावते त्या भौगोलिक ठिकाणचे वर्णन केले आहें. ब्रह्मगिरी हा महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगांतील एक उंच पर्वत आहे. त्र्यंबकेश्वर हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे गोदावरी कुशावर्त रूपाने प्रकट झाली आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधु श्री निवृत्तिनाथ यांची समाधि आहे.

जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।

भावार्थ:- एका आख्यायिकेनुसार, ‘श्री गौतम ऋषी’च्या कडून अनावधानाने गायीची हत्या होते, त्या गोहत्तेच्या पापातून मुक्त होण्यासाठी ते श्री भगवान शंकराची कठोर तपस्या करतात. कालांतराने, श्री भगवान शंकर त्यास प्रसन्न होतात आणि ‘श्री गौतम ऋषी’च्या पापनिवार्णार्थ गोदावरी नदीस प्रकट होण्यासाठी विनंती करतात. त्यासाठी ‘श्री शंकर भगवान’ ब्रह्मगिरी पर्वतावरील एका खडकावर आपल्या जटा आपटतात व गोदावरी नदी तिथे प्रकट होते. ‘गंगाद्वार‘ पासून प्रवाही झालेल्या गोदावरी नदीस अडविण्यासाठी ‘गौतम ऋषी’ कुशांचा बांध घालतात ते ‘कुशावर्त’ कुंड होय. कुंडापासून जवळच संत श्री ज्ञानेश्वर यांचे थोरले बंधू ‘संत श्री निवृत्तिनाथ’ यांची समाधी आहे.

जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।

भावार्थ:- प्रभुश्रीरामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेला अंजनेरी पर्वत गोदावरी नदीला आशीर्वाद देत असल्याचे आणि श्रीरामलक्ष्मण आणि सीता यांनी त्यांचा बहुतांशी वनवास काळ व्यतीत केला त्या नाशिक भागातील पंचवटी परिसरास गोदावरी नदी वंदन करत असल्याचे रूपक कवीने या तिसऱ्या श्लोकात केल्याचे आढळते.

जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।

भावार्थ:- आरतीच्या चौथ्या श्लोकात गोदावरी नदीमुळे आलेली समृद्धता प्रतिपादन केली आहे. गोदावरी नदीवर बांधलेल्या दोन प्रमुख धरणांचा प्रतीकात्मक उल्लेख केलेला आहे, ज्यात नाशिक येथील गंगापूर धरण आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण, त्यासच नाथसागर असेहि म्हणतात.

जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।

भावार्थ:- भारतातील पाच राज्यांमधून वाहणारी, १,४५० किलोमीटर लांब असलेली गोदावरी नदी भारताच्या दक्षिण भागातील सर्वात मोठी नदी असल्याने तीला भारताची दक्षिणगंगा म्हणतात. महाराष्ट्र राज्यातील पश्चिमेकडील पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी पर्वतावर १,०६७ मीटर उंचीवर गोदावरी नदीचा प्रवास सुरू होतो. पुढे ती आग्नेय दिशेने छत्तीसगढओडिशातेलंगणा असा प्रवास करत करत आंध्रप्रदेश राज्यातील राजमुंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.

तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।

भावार्थ:- शेवटच्या श्लोकात पुराणामध्ये गोदावरी नदीच्या ‘तुल्या’, ‘वसिष्ठा’, ‘गौतमी’, ‘भारद्वाजी’, ‘कौशिकी’, ‘आत्रेयी’ आणि ‘वृद्धगौतमी’ अशा सात उपनद्या असल्याचा उल्लेख वर्णिलेला आहे. तो श्लोक असा – “सप्तगोदावरी स्नात्वा नियतो नियताशन:। महापुण्यमप्राप्नोति देवलोकेच गच्छति॥” गोदावरी नदीची लांबी १,४६५ किलोमिटर आहे. उगमापासून ते संगमापर्यंतची एकूण साडेतीन कोटी तीर्थं असल्याचे मानले जाते, तसेच अनेक ऋषीमुनींनी गोदावरी तटांवर तपश्चर्या केल्याचा पुराणांत उल्लेख आहे. त्यामुळे असंख्य भाविकभक्त पायीं, सायकल अथवा इतर वाहनाने सुप्रसिद्ध अशी ‘गोदावरी-परिक्रमा‘ करताना सतत आढळतांत.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.godavariaarti.org/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *