ऑनलाईन दृक्श्राव्य ज्ञानेश्वरी

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आता आधुनिकतेची कास धरत इंटरनेटवर विश्वाला खुली झाली आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांच्या सुमधुर आवाजात संपूर्ण ज्ञानेश्वरी संगीतबद्ध करण्यात आली असून इंटरनेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विश्वात्मक उपलब्ध झाली आहे. ग्रंथाच्या पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होऊन मन स्थिर होते. तसेच सात्त्विकतेची आणि समाधानाची प्राप्ती होते असा थोरामोठय़ांचा अनुभव आहे. सध्याच्या धकाधकीच्या वेगवान काळामध्ये श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याची इच्छा असूनही अनेकांना ते शक्य होत नाही. अशांसाठी ही ऑनलाईन ज्ञानेश्वरी सुविधा म्हणजे पर्वणीच ठरावी. जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट ऐकता-बघता व सोबत म्हणता-गाता येणार आहे. गुरुवर्य किसन महाराज साखरे यांनी व्रतस्थ आणि सांप्रदायिक पद्धतीने केलेल्या सांप्रदायिक आणि शुद्ध अशा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ इंटरनेटद्वारे मिळणार आहे. ‘जयजयवंती’ रागामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण केले असून या पारायणामध्ये सात्त्विक वाद्यांचे साहाय्य घेण्यात आले आहे. या पारायणाचे अत्याधुनिक उच्च तंत्रज्ञानाचे माध्यमातून जतन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते नुकतेच ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओचे उद्घाटन करण्यात आले आहे. ऑनलाईन ज्ञानेश्वरीमुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखिल विश्वाला उपलब्ध झाला असल्याची भावना भटकर यांनी व्यक्त केली. सुनील खांडबहाले, यशोधन महाराज साखरे, नचिकेत भटकर, सारंग राजहंस, चिदंबरेश्वर साखरे आणि नचिकेत कंकाळ यांची या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. ऑनलाईन ज्ञानेश्वरीसाठी संकेतस्थळ dnyaneshwari.khandbahale.org

Leave a Reply0

Your email address will not be published.